पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधरण सभा नुकतीच पुण्यात पार पडली व या सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्रीव प्रख्यात क्रिडाप्रेमी सतेज पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव व भारतीय तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड पार पडली. महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे पदाधिकारी अशोक दुधारे यांनी सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व त्याला उपस्थित सर्वच सदस्यांनी उत्फुर्त अनुमोदन दिले.
आपल्या निवडीपर भाषणामध्ये सतेज पाटील यांनी तलवारबाजी सारख्या आपल्या मातीतील खेळाला राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या खेळाचे महत्व प्रत्येकाला समजावे व प्रत्येक जिल्ह्यात तलवारबाजीचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी विभागवार प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेत्या सदस्यांचा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संस्थेचे पदाधिकारी उदय डोंगरे यांनी सतेज पाटील यांच्या नियुक्तीने संघटनेला नविन बळ मिळेल व वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संघटनेच्या अदयावत संकेतस्थळाचे (वेबसाईटचे) उद्घाटन व अहवाल प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.