पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक विकसित असणाऱ्या प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर येथील पी.के. चौक किंवा कोकणे चौक येथे “WE LOVE PIMPLE SAUDAGAR, OUR PIMPLE SAUDAGAR SMART PIMPLE SAUDAGAR” चे सेल्फी पॉईंट उभारण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी ड प्रभाग कार्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी नाना काटे यांनी ही मागणी केली. महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागात अनेक अत्याधुनिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. संपूर्ण पिंपळे सौदागर परिसराचा विकास करत असताना नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाल्याच पाहिजे. परंतु सुसज्ज व स्मार्ट परिसरामध्ये देखील हा परिसर मागे पडता कामा नये.
यासाठी प्रभागात, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पाण्याची टाकी, उद्यान, योगा पार्क, विविध खेळाचे मैदान, सुशोभीकरण, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, लिनियर गार्डन व इतर कामे होत आहेत. ही कामे लवकरच पूर्ण होतील.
त्या दृष्टीने प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागरमध्ये पी.के. चौक किंवा कोकणे चौक येथे “WE LOVE PIMPLE SAUDAGAR, OUR PIMPLE SAUDAGAR, SMART PIMPLE SAUDAGAR” या प्रकारचा सेल्फी पॉईंट उभारण्यात यावा अशी मागणी नाना काटे यांनी केली.