पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड, चापेकर चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अर्बन स्ट्रीट डिझाईनमध्ये योग्य ते बदल करावेत. तसेच त्यात सुधारणा करण्याची मागणी भाजप नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक शेडगे यांनी म्हटले आहे की, सध्या अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार चिंचवडगावातील चापेकर चौकात सुशोभिकरणासाठी रस्त्यात पोती टाकून आखणी करण्यात आली आहे. यामुळे चौकात वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे.
क्रांतिवीर चापेकर बंधुंचे चापेकर चौकात शिल्प आहे. यामुळे चौकास विशेष ऐतिहासिक महत्व आहे. सुशोभिकरण करण्यासाठी आमची बिलकुल हरकत नाही. पण, काही सुधारणा व बदल करणे आवश्यक आहे.
चापेकर चौकात वाहतूक कोंडी होणार नाही. याची दक्षता घेऊन डिझाईन करावे. चौकातील रस्ते मोठे प्रशस्त व रुंद करावेत. उड्डाणपुलाखालील वाहन पार्किंग व्यवस्था शिस्तबद्ध ठेवावी. जोपर्यंत चिंचवड गावठाणातील विकासकामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ती ‘मोफत’ करावी. रिक्षा वाहन स्थळे पाहणी करून पक्की करावीत.
अधिकृत परवानाधारक हातगाड्यांची जागा निश्चित करावी. अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करावी. जेष्ठ नागरिक व सर्व सामान्य नागरिकांना चालता यावे. याकरिता जास्त रुंद नकोत पण व्यवस्थित फूटपाथ करावेत. चौकात अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या नगरसेवक शेडगे यांनी निवेदनातून केल्या आहेत.






















Join Our Whatsapp Group