पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरील कारवाई थंडावली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १८ पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी (दि.२८) रोजी दिवसभरात केवळ ६ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवार दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आलेली कारवाई..
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला होता. त्यावर उपाय म्हणून आता सर्वत्र लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारकडून यावर प्रतिबंध घालण्याकरीता नागरिकांना ‘विना मास्क’ न फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ‘विना मास्क’ फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे देखील आदेश नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत दिले आहेत.
मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असल्याचे दिसत असले, तरी भविष्यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान शहरात सध्या सर्रासपणे नागरिक ‘विना मास्क’ फिरताना दिसत आहेत. मात्र तरीदेखील पोलिसांकडून त्याकडे ‘कानाडोळा’ केला जात आहे. काल मंगळवारी (दि.२८) रोजी दिवसभरात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १८ पोलीस स्टेशन पैकी केवळ दोन पोलीस स्टेशनमध्येच ‘विना मास्क’ फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यात वाकड पोलीस स्टेशनमध्ये ०४ आणि म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील ०२ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने देखील कडक पावले उचलून अशाप्रकारे ‘विना मास्क’ रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींवर देखील कारवाई करण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

























Join Our Whatsapp Group