पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या दहा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या १० पटीने वाढली आहे. या वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मुलांचा ही समावेश लक्षणीय आहे. दि.१ ते ११ जानेवारी दरम्यान शहरात ८७८३ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये १०२३ मुलांचा समावेश आहे.
वयोगटानुसार पाहिले तर ० ते ५ वयोगटातल्या १६६ मुलांना, ६ ते १२ दरम्यान ३८८ मुलांना तर १३ ते १८ वयोगटादरम्यान ४६९ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच शहरात जवळपास एकूण रुग्णांपैकी ११.६४ टक्के रुग्ण ० ते १८ वयोगटातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि मुलांचीही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शाळा सुरुच ठेवा, अशी मागणी एका वर्गाकडून केली जात आहे. पण त्यांनी कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या लहान मुलांची आकडेवारीकडे ही लक्ष द्यायला हवे. कारण पिंपरी चिंचवड शहरात अवघ्या दहा दिवसात १०२३ लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सुदैवाची बाब इतकीच आहे, की सध्या केवळ ४ मुलेच महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असून त्यांनाही सौम्य लक्षण आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांनी कोरोनावर मात देखील केली आहे.
गेल्या दहा दिवसांत १०२३ मुले कोरोना रुग्ण आढळले आहेत. पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांची शाळा ही ऑनलाईनच सुरू होती. पण ६ ते १८ वयोगटातील सर्वच मुलांच्या शाळा या ऑफलाईन सुरू होत्या. हे पाहता वरील आकडेवारी आणखी चिंता निर्माण करते. कारण ज्यांची शाळा ऑनलाईन सुरू होती, त्या ० ते ५ वयोगटातील केवळ १६६ मुलांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील बहुतांश हे पालकांच्या संपर्कात आलेत.
मात्र ज्यांची ९ जानेवारीपर्यंत ऑफलाईन शाळा होती, त्या ६ ते १८ या वयोगटातील तब्बल ८५७ मुलांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलयं. सुदैवाची बाब इतकीच आहे, की पालिकेने लहान मुलांसाठी राखीव ठेवलेल्या नवीन जिजामाता रुग्णालयात सध्या केवळ चारच लहान मुलं भरती आहेत आणि त्यांनाही सौम्य लक्षण आढळत आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांनी तर कोरोनावर मात देखील केली आहे.
दरम्यान, शहरात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव पाहता पालकांनी स्वत:सह मुलांची विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरणार आहे.
























Join Our Whatsapp Group