पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या छायाचित्राचा व्हॉटस्अॅप प्रोफाईल म्हणून वापर करून ऑनलाईन चॅटिंगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसविण्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटिंग केले जात आहे. तसेच आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे. अज्ञात व्यक्तीने मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी आयुक्तांचा डीपी वापरून ऑनलाईन चॅटिंग केली. आर्थिक मदतीची विचारणा केली आहे.
माझ्या फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, महापालिकेतील पदाधिकारी अधिकारी आणि शहरवासीयांना कळविण्यात येते की, आपल्याला कुणी फेक आयडीवरून फसवणूक होऊ नये, याची दक्षता घ्यावी
– राजेश पाटील, आयुक्त, मनपा.