लोणावळा (Pclive7.com):- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज (दि.१५) भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ४ जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली.
यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्या दरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.
महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.