पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित चोविसाव्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या दुस-या दिवशी शनिवारी (१२ मार्च) स्वीकार कट्टी या युवा कलाकाराचे अप्रतिम सतारवादन सादर झाले. तसेच नंतरच्या सत्रात आम्ही दुनियेचे राजे ही खास संगीतिका सादर करण्यात आली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगणा-या या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी स्वीकार कट्टी या युवा सतारवादकाचे सुरेल वादन सादर झाले. डॉ. सुनील कट्टी यांचा मुलगा व शिष्य असलेला स्वीकार हा इटावा घराण्याचा वादक आहे. त्याने यावेळी राग पुरिया कल्याण सादर केला. आलाप, जोड, झालातून स्वीकारने वादनाची सुरुवात केली. नंतर त्याने रुपक व तीनतालातील वादन सादर केले. सतारीवर लीलया फिरणारी त्याची बोटे त्याची वादनातील तयारी दाखवून गेली. अत्यंत सुरेल आणि अप्रतिम सतारवादनाने स्वीकारने रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वीकारला तितकीची समर्पक व दमदार तबला साथ युवा वादक शंतनू देशमुख याने केली. या दोन्ही युवा कलाकारांनी आपल्या बहारदार वादनाने रसिकांची पसंतीची दाद मिळवली.
या सतारवादनानंतर आम्ही दुनियेचे राजे ही संगीतिका सादर करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि तिला राजमान्यता मिळावी म्हणून सध्या विशेष चळवळ सुरु आहे. याच्या समर्थनार्थ आम्ही दुनियेचे राजे ही संगीतिका स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवात विशेषत्वाने सादर करण्यात आली. वाइड विंग्ज मिडिया आणि डीवर्ब एक्सप्रेशन यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताची पहिली पाच दशके म्हणजे १९१० ते १९६० या काळातील पाच दिग्गज संगीतकारांची गाणी सादर करण्यात आली. संगीत व नाट्य यांचा मिलाफ घडवणा-या या कार्यक्रमात मास्टर कृष्णराव, पु. ल. देशपांडे, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे व सुधीर फडके यांची अजरामर गाणी वेगळ्या संगीतसाजातून गायक व वादक कलाकारांनी सादर केली. यात वसंत पवार, राम कदम यांसारख्या समकालीनांच्या गाण्यांचादेखील अंतर्भाव होता. या कार्यक्रमात मूळ गाणी तरुणाईला साद घालणा-या वेगळ्या सुरावटींवर सादर करण्यात आली. विशेष म्हणजे रसिकांना फारशा माहित नसलेल्या दोन वेगळ्या लावण्या यावेळी सादर करण्यात आल्या. या दोन्ही लावण्या टाळ्या आणि शिट्ट्यांची खास दाद घेऊन गेल्या. पुलंची नाममुद्रा असलेला वा-यावरची वरात मधील छोटासा प्रवेश उल्लेखनीय होता.
अवीट गोडीची ही अजरामर असलेली गाणी यावेळी जयदीप वैद्य, आशुतोष मुंगळे, मुक्ता जोशी, राजेश्वरी पवार यांनी समर्थपणे सादर केली. त्यांना खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण निवेदनाची साथ अभिनेता अभिजीत खांडकेकर व अभिनेत्री गौतमी देशपांडे यांनी केली. या कार्यक्रमाची संहिता लेखन, दिग्दर्शन आणि संगीत संयोजन देवेंद्र भोमे याचे होते. संवादलेखन देवेंद्र भोमे व केतन पवार यांचे होते.
या कार्यक्रमांआधी पिंपरी चिंचवडमधील उदयोन्मुख कलाकारांसाठी खास गायन व तबला वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला अशी माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी दिली.