आळंदी (Pclive7.com):- आळंदीत इंद्रायणी नदी अद्यापही फेसाळलेलीच आहे. अवघ्या काही दिवसांवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आलेला असताना देखील प्रशासन इंद्रायणी प्रदूषणाकडे गांभीर्याने बघत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच आळंदीचे विश्वस्त यांनी यासंबंधी आंदोलनाचा इशारा दिला होता. नदीतील फेस आता थेट मंदिराजवळ आला आहे. ज्या ठिकाणी वारकरी मोठ्या श्रद्धेने इंद्रायणीत आचमन करत स्नान करतात तिथेच मोठ्या प्रमाणात फेस दिसत आहे.
इंद्रायणी नदी जलप्रदूषणाचा प्रश्न खूप वर्षांपासूनचा आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही. याआधी अनेकदा अगदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासन हवेत विरल्याचे बोलले जात आहे. त्यानंतरही अनेकदा इंद्रायणी नदी फेसाळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा इंद्रायणी नदी प्रदूषित झाली असून केमिकलयुक्त फेस नदीवर दिसत आहे.
माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर आला आहे. असे असले तरी इंद्रायणीमधील प्रदूषण मात्र कमी होत नाही. इंद्रायणी नदी स्वच्छ केली जात नाही. यावरून आक्रमक होत आळंदीचे विश्वस्त यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. अनेकदा जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील आळंदी विश्वस्तांनी इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा मांडलेला आहे. पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना देखील अनेकदा पत्र दिले आहेत. मात्र तरी देखील हे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आळंदी संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.























Join Our Whatsapp Group