समर्थ रामदासांच्या विचारांना आधुनिक मानवंदना
पिंपरी (Pclive7.com):- समर्थ रामदास स्वामींची शिकवण, मनोपासना, बलोपासना आणि नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग अशा प्रेरणादायी वातावरणात आगामी ‘समर्थ’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण पुण्यात पार पडले. पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा विशेष उत्साहात संपन्न झाला.

समर्थ रामदासांनी दिलेल्या मनोपासना आणि बलोपासनेच्या शिकवणीचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या सूर्यनमस्कार घालत समर्थांच्या विचारांना मानवंदना दिली. तर मनाचे श्लोकमधील १३ श्लोकांचे एकसुरात पठण करत परिसर भक्तिमय आणि ऊर्जावान वातावरणाने भारून गेला होता.
या अनोख्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. आजच्या पिढीला समर्थ रामदास स्वामींच्या विचारांशी जोडण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे प्रमुख बाळासाहेब स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय चंद्रतनय दादा उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी उद्बोधनातून समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा आधार घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले व समर्थ विचारांचा संदेश दिला. याव्यतिरिक्त डॉ. राजीव नगरकर, रामकथाकार, प्रवचनकार तसेच चित्रपटाचे मूळ कथा आणि संकल्पनाकार रवींद्र पाठक, दिग्दर्शक योगेश फुलफगर, क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि कार्यकारी निर्माता अमोल भगत, तसेच कलाकार पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनीस, हार्दिक जोशी आणि यतीन कार्येकर, ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित होते.
कथा आणि संकल्पनाकार रवींद्र पाठक, “समर्थ रामदास स्वामी हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून आजच्या काळासाठीही तेवढेच आवश्यक असे विचार आहेत. शिस्त, सामर्थ्य, राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वासाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या शिकवणीची नव्या पिढीशी नव्या माध्यमातून ओळख करून देण्याचा प्रयत्न आम्ही ‘समर्थ’मधून करत आहोत. शेकडो विद्यार्थ्यांच्या साक्षीने झालेले हे पोस्टर अनावरण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहे.”
यावेळी दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणाले, ”हा एक आधुनिक काळातील मनोरंजनप्रधान चित्रपट आहे. समर्थ रामदासांच्या विचारसरणीचा आजच्या काळातही युवक, नवपिढी आणि समाजातील प्रत्येक घटकाला कसा फायदा होऊ शकतो, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. काळाच्या ओघात आपण त्यांच्या अनेक विचारांचा विसर पाडला आहे; मात्र त्या विचारांची कास धरली, तर त्यातून वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर कोणते सकारात्मक बदल घडू शकतात, याचं मनोरंजक चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा समर्थ रामदासांचा बायोपिक नसून, त्यांच्या विचारांवर आधारित एक व्यावसायिक चित्रपट आहे.”
थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक संदर्भात घेतलेला हा प्रवास रसिकांसाठी प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. रवींद्र पाठक यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.




















Join Our Whatsapp Group