पिंपरी (Pclive7.com):- भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळवून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी जलवाहिनी प्रकल्पाच्या विलंबाबाबत भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी चालू विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. शहराचा पाण्याचा प्रश्न तातडीने सुटावा आणि प्रकल्पात चालढकल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आमदार गोरखे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या वादग्रस्त ठेकेदाराला हटवून आता दोन नव्या निविदा काढून युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

आमदार अमित गोरखे यांनी अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. पिंपरी-चिंचवडकरांना हक्काचे पाणी मिळवून देणारा भामा-आसखेड प्रकल्प वेळेत का पूर्ण झाला नाही? तसेच काम रखडवणाऱ्या आणि काळ्या यादीत नाव असलेल्या ठेकेदारालाच पुन्हा काम दिले गेले आहे काय? असा थेट सवाल आमदार अमित गोरखे यांनी विचारला होता. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत ‘काळ्या यादीतील ठेकेदाराला पुन्हा काम दिलेले नाही’ असे स्पष्ट केले. तसेच, प्रकल्पाचा विलंब टाळण्यासाठी आणि काम तातडीने पूर्ण करण्यासाठी जुन्या कंत्राटदारावरील कारवाईनंतर आता नवीन पारदर्शक पद्धतीने दोन वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची अधिकृत माहिती शासनाने दिली.

शासनाने जाहीर केलेली नवी रुपरेषा
प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने तब्बल ८४ कोटींच्या दोन नवीन निविदा काढल्या आहेत. यामध्ये नवलाख उंब्रे ब्रेकप्रेशर टाकी ते तळवडे देहू दरम्यान १४०० मि.मी. व्यासाची गुरुत्वनलिका टाकण्याच्या उर्वरित कामासाठी ५० कोटी ६८ लाख ९२ हजार ३६४ रुपयांची निविदा काढण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यासाठी १० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उंब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मि.मी. व्यासाची रायझिंग मेन टाकण्याच्या कामासाठी ३३ कोटी ३४ लाख ४३ हजार ९२० रुपयांची निविदा काढण्यात आली असून हे काम ९ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून नागरिकांना मुबलक पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामात झालेला विलंब अजिबात खपवून घेतला जाणार नाही. यापूर्वी ज्यांनी कामात हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाईची मागणी मी लावून धरली होती. आता शासनाने नवीन कंत्राटदारांमार्फत ९ ते १० महिन्यांची कडक मुदत देऊन काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या या मुदतीत काम पूर्ण करून घेण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या घराघरात पाणी पोहोचेपर्यंत माझा हा पाठपुरावा अविरत सुरूच राहील.– आमदार अमित गोरखे
Tags: Amit Gorkhe




















Join Our Whatsapp Group