पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांसमोरील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या ‘नो पार्किंग’ फलकांचा फेरआढावा घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते तथा युवासेना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांची भेट घेऊन निवेदन साद केले.

निवेदनात चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे की, रुग्णालयात येणारे नागरिक हे उपचार, वैद्यकीय तपासणी, आपत्कालीन सेवा किंवा गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी येत असतात. अशा वेळी रुग्णाला शक्य तितक्या लवकर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असते. मात्र अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी वाहनतळ व्यवस्था नसल्याने नातेवाईकांना काही काळासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करावे लागते.

अशा परिस्थितीत ‘नो पार्किंग’ नियमाचा आधार घेत वाहनांवर दंड आकारणे किंवा वाहने उचलण्याची कारवाई केल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक विभागाने अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलता दाखवून परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

चेतन बेंद्रे यांनी रुग्णालयांमधील पार्किंग सुविधांचाही प्रश्न उपस्थित केला. ज्या रुग्णालयांमध्ये वाहनतळाची व्यवस्था अपुरी अथवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित संस्थांवर आवश्यक ती कारवाई करावी. केवळ रुग्णांच्या नातेवाईकांवर दंडात्मक कारवाई करून वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच रुग्णालयांसमोरील ‘नो पार्किंग’ क्षेत्र निश्चित करताना रुग्णवाहिका, रुग्णांना उतरविणे-चढविणे, आपत्कालीन प्रवेशद्वार आणि अल्पकालीन वाहन थांबविण्याची गरज यांचा स्वतंत्रपणे विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

“वाहतूक शिस्त आणि रुग्णांच्या अडचणी यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. नियम नागरिकांच्या सोयीसाठी असले पाहिजेत. मात्र आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे चेतन बेंद्रे यांनी यावेळी सांगितले.

रुग्णांच्या हिताचा विचार करून शहरातील रुग्णालयांसमोरील ‘नो पार्किंग’ व्यवस्था, फलकांची आवश्यकता आणि उपलब्ध पार्किंग सुविधांचा संयुक्तपणे फेरआढावा घेण्यात यावा, तसेच वैद्यकीय कारणांसाठी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही यासाठी वाहतूक विभागाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group