पिंपरी (Pclive7.com):- व्हॉट्सअॅपवर स्वस्त दरात थार कार खरेदीचे आमिष दाखवून एकाची तब्बल ८ लाख ५१ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रफीक अमीर मुल्ला (वय ५५, रा. महानतेशनगर, बेलगम, हुक्केरी, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफीक अमीर मुल्ला याने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून आपण मोठ्या प्रमाणात वाहन विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती दिली. तसेच मारुती सुझुकी इर्टिगा व महिंद्रा थार या वाहनांचे फोटो पाठवून ती वाहने कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी विविध टप्प्यांत ८ लाख ५१ हजार ६०० रुपये दिले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने ना वाहनांची डिलिव्हरी दिली, ना रक्कम परत केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही घटना १२ जुलै २०२४ ते २२ जून २०२६ या कालावधीत खराळवाडी येथील सोनकर रेसिडेन्सी परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group