पिंपरी (Pclive7.com) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती, शैक्षणिक नोंदी, विविध शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन पोर्टलवरील माहिती भरणे, उपस्थिती नोंद, परीक्षा माहिती आणि इतर प्रशासकीय कामांचा वाढता भार लक्षात घेता प्रत्येक शाळेत स्वतंत्र डेटा ऑपरेटरची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात ऐश्वर्या तरस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अनेक शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटर उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे अध्यापनासाठी उपलब्ध होणारा वेळ कमी होत असून त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

त्यामुळे महापालिकेतील सर्व शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटर नेमणे, विद्यार्थी संख्या व प्रशासकीय कामांचा भार लक्षात घेऊन अतिरिक्त डेटा ऑपरेटर उपलब्ध करून देणे, शासकीय व महापालिका स्तरावरील ऑनलाइन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच शाळांमधील डिजिटल व ई-गव्हर्नन्स संबंधित कामकाज अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी, शाळांमधील प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्यासाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group