पिंपरी (Pclive7.com):- अन्न व औषध प्रशासनाने चिखली परिसरात मोठी धाड टाकत तब्बल २० लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून, संबंधित आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने चिखली येथील एका गोदामावर छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राथमिक तपासात हा साठा रुस्तम खान आणि बाबर खान यांनी गोदामात साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गौस मोयोद्दीन हा या प्रतिबंधित मालाचा पुरवठादार असल्याची माहिती समोर आली आहे. राणा प्रताप सिंग आणि देवराम दिवसे हे शहरात बेकायदेशीर गुटखा व पान मसाल्याच्या विक्रीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचेही तपासातून उघड झाले आहे.

या प्रकरणाचे स्वरूप संघटित गुन्हेगारीचे असल्याने संबंधित सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू असून, या रॅकेटशी संबंधित आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group