पिंपरी (Pclive7.com):- “ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालक बांधव हे समाजाचा कणा आहेत. या कष्टकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे, त्यांचा राजकीय व सामाजिक सन्मान जपून त्यांना हक्काचे अस्तित्व मिळवून देणे हेच ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’चे अंतिम ध्येय आहे. गेल्या २० वर्षांपासून आपली संघटना रिक्षा चालक, टॅक्सी-कॅब चालक आणि असंघटित कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे,” असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’चे संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केले.

चिखली गाव येथील ऐतिहासिक गणपती मंदिर मुख्य कमान परिसरात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबा कांबळे यांनी रिक्षा व्यवसायाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव:
या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष श्री. विजय ढगारे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. धनंजय कुदळे आणि पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष श्री. दीपक ताटे यांना पगडी, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.या नवीन नेतृत्वाकडून संघटनेच्या कार्याला नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डॉ. बाबा कांबळे यांचे स्पष्ट आवाहन व मार्गदर्शन:
डॉ. बाबा कांबळे यांनी उपस्थित चालकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करताना सांगितले की, “प्रवासी हेच आपले दैवत आहेत. त्यांची सेवा करताना मीटरनेच व्यवसाय करण्याला प्राधान्य द्या, भाडे नाकारू नका; सेवा हीच आपली खरी संस्कृती असावी. शहरात फोफावलेल्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रिक्षा व्यवसायात बकालपणा येत आहे, यावर कडक नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन प्रशासनाकडे आक्रमकपणे पाठपुरावा करणे काळाची गरज आहे.
रिक्षा-टॅक्सी व्यवसायाची प्रतिमा उंचावून प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येक चालकाने जबाबदारीने व शिस्तबद्धपणे वागणे, हेच आपल्या प्रगतीचे सूत्र आहे.
भोसरी मतदारसंघातील आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून भोसरी मतदारसंघातील रिक्षा टॅक्सी चालक व असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडले जात आहेत, असे नमूद करून डॉ. बाबा कांबळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या की, चिखली, जाधववाडी, मोई आणि तळवडे या भागांतील रिक्षाचालकांच्या अडीअडचणींना सर्वोच्च प्राधान्य देऊन संघटनेचे कार्य अधिक गतिमान व जनभिमुख करावे.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समितीच्या सदस्या सौ. आशा कांबळे, मेजर प्रदीप बावस्कर, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना गुंड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरज सोनवणे, डी-मार्ट रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष सुनील कदम, दत्ता गिले, अंतोनी पंडित यांच्यासह संघटनेचे अनेक जेष्ठ पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक व निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन चिखली येथील श्रीराम रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब डवरी, बापू देशमुख, उमेश गाडेकर, माऊली लगाडे, सागर डवरी, हरिदास सावंत, मनोज ठाकूर आणि प्रकाश दुबे यांनी केले.




















Join Our Whatsapp Group