पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांची भुमिपूजने, उद्घाटने शनिवारी (दि.१६) सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर प्रशासकिय राजवटीत पवार यांचा हा अवघा दोन तासांचा दौरा तसा खूप महत्वाचा समजला जातोय.

शनिवारी सकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात उपमुख्यमंत्री पवार येणार आहेत. सुरवातीला त्यांच्या हस्ते उद्योग सुविधा कक्षाचे उद्धटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना बंदोबस्तासाठी ५० स्मार्ट बाईक हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम होईल. महापालिकेच्या धडक कारवाई पथकाला आवश्यक वाहनांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते कऱण्यात येणार आहे.
पुढे ७.३० वाजता कासारवाडी येथील क्रीडा संकुल, मैदानाचे उद्घाटन, ७.५० वाजता भोसरी येथील सखुबाई गबाजी गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळाचे भुमिपूजन. ८.२० वा. तळवडे येथील जॉगिंग सेंटर व नव्याने विकसीत केलेल्या उद्यानाचे उद्घाटन, ८.३० वाजता तळवडे चौक सुशोभिकरण तसेच महिला व विद्यार्थांकरिता सुरु होणाऱ्या एमएससीआयटी केंद्राचे उद्घाटन, स.९ वाजता पिंपरी चिंचवड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे भुमिपूजन पिंपळे गुरव येथील लिंबोणी पार्क चौकात, स.९.१५ वाजता पिंपळे सौदागर रोड येथे स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन आणि ९.३० वाजता वाकड येथील कै. तानाजी तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन होणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनल्याने राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचे अधिकार राज्य सरकारने ठराव करुन स्वतःकडे घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, अशी भूमिका शिवसेना, राष्ट्रवादी महाआघाडीसह विरोधातील भाजपानेही कायम ठेवली आहे. तीन सदस्यांची प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश राज्य सराकारने सोमवारी सर्व महापालिकांना दिले आहेत.
दरम्यान, राज्य सराकरच्या निर्णयाला विविध सात व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर २१ एप्रिल रोजी सुनावणी आहे. न्यायालयाने याचिका फेटाळली तर कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशी परिस्थिती आहे, तर आता या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असाही अंदाज व्यक्त केला जात असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
























Join Our Whatsapp Group