पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या ६ नगरसेवकांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून त्याच्या आत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद्द रद्द होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत ६४ नगरसेवक राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. या नगरसेवकांना निवडून आल्यापासून सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करणे बंधनकारक आहे. जुलै महिन्यात २२ जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला आहे. त्यामध्ये वाढ होऊन आजपर्यंत ५८ जणांनी दाखला जमा केला आहे. तर, भाजपच्या ६ नगरसेवकांनी अद्यापही दाखला जमा केला नाही.
२३ फेब्रुवारीला नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दाखला जमा करण्यासाठी २२ ऑगस्ट अंतिम तारिख आहे. त्यामुळे दाखला जमा करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याच्या आत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद्द रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपचे कुंदन अंबादास गायकवाड (प्रभाग १, चिखली), यशोदा बोईनवाड (प्रभाग ६ धावडेवस्ती), शैलेंद्र मोरे (प्रभाग १९, आनंदनगर, दळवीनगर), मनिषा प्रमोद पवार (प्रभाग २३ थेरगाव), कमल घोलप (प्रभाग १३, निगडी) आणि शशिकांत कदम (प्रभाग २९ पिंपळेगुरव) यांचे प्रमाणपत्र बाकी राहिले आहे. यापैकी कुंदन गायकवाड यांनी उच्च न्यायालयातून जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून घेतली आहे.