पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिक्षक सेल अध्यक्षपदी चऱ्होलीतील डॉ. संदीप तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतीच उपमुख्यंत्री अजितदादा पवार, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगिण विकासासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी शहरातील जेष्ठ नेते तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. राजकारणामध्ये यापूर्वी शिक्षकांनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पासून डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ते दिवंगत प्रा.रामकृष्ण मोरे यांनी मोलाचे कार्य केले आहे. एक शिक्षक अतिशय चांगल्या पध्दतीने राजकारणात नेतृत्व करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यासाठी शिक्षकांचे महत्त्व ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिक्षक सेल याला महत्त्व दिले आहे.
डॉ. संदीप तापकीर म्हणाले, शिक्षक सेल हे आपल्या शहरातील सर्व शिक्षकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून उपलब्ध आहे. सर्व शिक्षकांना एकत्रित आणण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक सेल हे हक्काचे व्यासपीठ आहे. शिक्षक हे देशाची नवी पिढी घडविण्याचे काम करतात. या शिक्षकांनीही राजकारणात सहभाग घेऊन एक दिशा द्यावी. यासाठी हे शिक्षक सेल महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. डॉ. तापकीर यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.