राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विविध पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे ५० टक्क्यांच्या आसपास मते होती. पण, आदिवासी समाजातील महिला उमेदवार म्हणून विविध राजकीय व प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. १० लाख, ८६ हजार, ४३१ एकूण मत मूल्यांपैकी मुर्मू यांना साडे सहा लाखांपेक्षा अधिक मतमूल्य मिळेल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे.
तृणमूल काँग्रेसने विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी या पक्षाचे काही आमदार भाजपच्या मुर्मू यांना मतदान करण्याची शक्यता वर्तविली जाते. पश्चिम बंगालमधील आदिवासी समाजात संथाल समाजाचे प्राबल्य असून, मुर्मू या समाजाच्या असल्याने तृणमूलमधील संथाल समाजाचे आमदार त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणूनच तृणमूलने सर्व आमदारांना पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे, असे बजावले आहे.
विरोधी आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेने आदिवासी समाजातील उमेदवार या मुद्दय़ावर भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. परिणामी यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य कमी होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आदींनी सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला.
मूळच्या ओदिशाच्या असलेल्या मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला तर आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहेत. प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. आपल्या निवडीमुळे आदिवासी समाजाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.
राज्यातून ७० टक्क्यांच्या आसपास मतदारांचा पाठिंबा
भाजप, शिवसेना, शिवसेनेतील शिंदे गट, अपक्ष व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची २८७ पैकी १८०पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता आहे. संसदेच्या उभय सभागृहातील ६७ खासदारांपैकी भाजप, शिवसेना आणि अपक्ष खासदारांचे संख्याबळ ५४ आहे. खासदार आणि आमदारांचे एकूण संख्याबळ लक्षात घेतल्यास राज्यातून भाजपच्या मुर्मू यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळू शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील आदिवासी समाजाच्या आमदारांना भाजपने मतदानाचे आवाहन केले आहे. या निवडणुकीत भाजपच्या मुर्मू यांना २००च्या आसपास आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
- एकूण मतदार – ४८०९
- लोकसभा खासदार – ५४३
- राज्यसभा खासदार – २३३
- राज्यांमधील एकूण आमदार – ४०३३
- एकूण मतांचे मूल्य – १० लाख, ८६ हजार, ४३१
- खासदारांच्या मतांचे मूल्य – ७००
- राज्यांमधील आमदारांचे मताचे मूल्य हे लोकसंख्येवर आधारित
- खासदारांचे एकूण मत मूल्य – ५ लाख, ४३ हजार, २००
- आमदारांचे एकूण मत मूल्य – ५ लाख, ४३ हजार, २३१
उपराष्ट्रपतीपदासाठी धनखड-अल्वा लढत
उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली़ उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपने शनिवारी घोषणा केली होती़ त्यामुळे ६ ऑगस्टला होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनखड आणि अल्वा यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.