पिंपरी (Pclive7.com):- ‘रिड्यूस, रियुज अँड रिसायकल’ या त्रिसूत्रीवर आधारित टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून महापालिकेच्या वतीने पिंपळे निलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात साकारण्यात आलेले “वेस्ट टू वंडर” मॉडेल हे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक ठरणार आहे. हा अभिनव उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय ठरेल, असे मत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या पिंपळे निलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात टाकाऊ वस्तूंचा वापर करून “वेस्ट टू वंडर” मॉडेल साकारण्यात आले आहे. या मॉडेलचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सह शहर अभियंता मनोज सेठिया, उप आयुक्त सुभाष इंगळे, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी, दत्तात्रय आढळे, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, मंजुष हिंगे, उद्यान अधिकारी नम्रता मगर, शंकर भोकरे, सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, दैनंदिन जीवनात वापरात येत असलेल्या पुनर्वापरायोग्य वस्तूंचा पुनर्वापर होणे आवश्यक असून त्यामुळे मर्यादित असलेल्या नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन होण्यास मदत होईल, तसेच प्लास्टिक किंवा अविघटनशील पदार्थ अथवा वस्तूंचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणाचे समतोल देखील राखले जाईल. महापालिकेच्या उद्यान विभागाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून नागरिकांनी आपल्या घरातील टाकाऊ वस्तुंचा कल्पक्तेने वापर करून ‘रिड्यूस, रियुज अँड रिसायकल’ या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. महापालिकेच्या वतीने शहरात पूर्णपणे टाकाऊ वस्तूंपासून सुशोभित, आकर्षक व प्रेरणादायी असे ‘वेस्ट टू वंडर’ पार्क विकसित करण्याचा मानस असून त्यासाठी उद्यान राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात साकारण्यात आलेल्या “वेस्ट टू वंडर” मॉडेलमध्ये टाकाऊ फायबर रेनफोर्स्ड प्लास्टिक (एफआरपी) पासून ‘सेव ट्री,सेव लाईफ’ स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये एफआरपी पासून तयार करण्यात आलेल्या दोन्ही मानवी तळहातावर नैसर्गिक फुलांच्या व शोभेच्या रोपांची लागवड करण्यात आली असून, हे स्मारक उद्यानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्मारकाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण मानवाच्या हाती असल्याचा संदेश देण्यात येत आहे. उद्यानात आकर्षक व हरित स्वागत कमान उभारण्यात आली आहे, स्वागत कमानीच्या दोन्ही उभ्या खांबांवर वर्टीकल गार्डन तयार करण्यात आले असून त्यामध्ये ‘वेस्ट टू वंडर’ हे नाव इंग्रजी अक्षरात लिहिले आहे.
टाकाऊ जुन्या विद्युत खांबांपासून शोभेच्या ‘तोफ’ तयार करण्यात आल्या आहेत, तसेच जुन्या जीन्स पॅन्ट पासून योगासनाचे विविध प्रकार दर्शवणारा अर्धआकृती मानव साकारण्यात आले आहेत, टाकाऊ खेळण्यांचा वापर करून आकर्षक ‘ट्रॉफी’ तयार करण्यात आली आहे, जुन्या टायरचा वापर करून हुबेहूब घड्याळाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे, जुने विद्युत खांब, प्लास्टिक आणि बहुरंगी फुलांचा वापर करून उड्डाण भरणारे फुलपाखरू निर्माण करण्यात आले आहे, जुन्या लाकडांचा वापर करुन आकर्षक बैलगाडी तर लाकडाच्या ओंडक्यापासून प्रतीकात्मक रेल्वे तयार करण्यात आली आहे.
लाकडांचा वापर करून मानवी चेहऱ्यावरील विविध भाव दर्शवणाऱ्या विदूषकाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत, जुन्या तेलाच्या टाक्यांचा वापर करून ‘हॅप्पी मॅन’ चे पुतळे तयार उभारले आहेत, तसेच जुने टायर, विद्युत खांब, आणि बांबू वापरून ‘रणगाडा’ उभा केला आहे, तर टायर पासून बनविलेल्या बुलेट दुचाकीचे कौतुक नागरिकांनी केले. वेस्ट टू वंडर पार्कच्या उद्घाटनापूर्वीच साकारण्यात आलेल्या साहित्याबरोबर नागरिकांनी सेल्फी काढण्याचा सपाटा लावला होता. “वेस्ट टू वंडर” मॉडेल हा आगळा वेगळा उपक्रम असून याठीकाणी नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे, आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
Tags: GardenPimple NilakhPimpri Chinchwad Municipal CorporationSavitribai Phule GardenWeast to Wonder
























Join Our Whatsapp Group