अफिम तस्करीसाठी होणार होता कारचा वापर; गुन्हे शाखा युनिट एकची धाडसी कारवाई
पिंपरी (Pclive7.com):- सोसायटीमध्ये पार्क केलेल्या ह्युंदाई आय २० आणि ह्युंदाई क्रेटा या दोन अलिशान गाड्या अज्ञात चोरट्यांनी (दि.५) रोजी रात्रीच्या वेळी चोरी करून नेल्या होत्या. हेमंत यशवंत भोसले (रा. से. नं. २७, शरद हौसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी) आणि नितीन माणिकराव पवार हे गाडी मालक आहेत. त्याबाबत हेमंत यशवंत भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठांच्या आदेशान्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस पथक करीत होते. गुन्ह्याचे ठिकाण तसेच इतर वेगवेळ्या ठिकाणचे सी.सी. टिव्ही फुटेज चेक करत असताना या दोन्ही गाड्या नाशिक रोडने गेल्या असल्याचे त्यांना दिसुन आले. तपास पथकाने नाशिक हायवेवरील सिसिटिव्ही फुटेज नाशिक येथील येवलापर्यंत तपासले. त्यावेळी दोन्ही कारच्या नंबर प्लेट बदली करून राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना दिसुन आले. तसेच त्यासोबत आय १० ह्या तिस-या गाडीचा नंबर तपास पथकाला मिळाला. या नंबरवरुन पोलिसांनी मालकाचा नाव, पत्ता मिळवीत त्याबाबत तपास केला. गाडी मालकाचा मोबाईल घटनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ठाणे शहर हद्दीत दिसुन आला. तसेच त्या कारवर वाहतुक विभागाचे चलनही त्याच वेळी ठाणे शहर हद्दीत पडले असल्याचे दिसुन आले. या फोनचे दुसऱ्या दिवशी सकाळचे लोकेशन हे येवला, नाशिक येथे दिसुन आले. यावरुन तपास पथकाला दोन्ही कारची चोरी त्याच कारच्या मालकाने त्याच्या साथीदारासमवेत केली असावी असा संशय निर्माण झाला.
खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक सांचौर, जि. जालोर, राजस्थान येथे गेले. पथकाने सलग ४ दिवस राहुन आरोपीबाबत गोपणीय माहिती काढली. आरोपी हा स्थानिक पोलीस स्टेशनमधील रेकार्डवरील गुन्हेगार असुन त्याचा साथीदार अफिम तस्करीमध्ये वॉटेड आरोपी आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेला आरोपी असल्याने तपास पथकाने गोपणीय पद्धतीने पाळत ठेवुन आरोपीला तेथील मार्केटमधून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याचे ईतर साथीदार पळुन गेले. रमेश प्रभुराम बिष्णोई (वय २४ वर्षे, रा. सियागाव, पुर, ता. सांचौर, जि. जालोर, राज्य राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचा मित्र सुरेश वाघाराम (रा. बाडमेर, राजस्थान) याच्या मदतीने दोन्ही कार चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी चोरलेल्या दोन्ही गाड्या त्याची किंमत २० लाख असून आरोपीच्या मुळ गावातुन हस्तगत केल्या आहेत.
तपासात आरोपी सुरेश वाघाराम, (रा. बाडमेर, राजस्थान) हा एनडीपीएस गुन्ह्यामध्ये राजस्थान पोलीसांना हवा असणारा आरोपी असुन क्रेटा तसेच आय २० सारख्या महागड्या गाड्या चोरुन नंबर तसेच इंजीन नंबर बदलुन त्या अफिम तस्करीसाठी या गाड्या चोरल्या असल्याचे आरोपीने सांगितले आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असुन त्याच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत. तात्काळ कारवाई केल्यामुळे दोन्ही कारची विल्हेवाट लावण्यापूर्वीच मूळ स्थितीत गाड्या मिळविण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, मनोजकुमार कमले, प्रमोद हिरळकर यांच्या पथकाने केली आहे. तपासकामात तांत्रीक शाखेचे पो.ह. प्रशांत माळी यांनी विशेष सहकार्य केले आहे.