पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील ॲटो क्लस्टर समोरील नवीन १८ मजली प्रशासकीय इमारत उभारण्यास अखेर मुहूर्त लागला आहे. त्यासाठी एकूण २८६ कोटी ८३ लाख ७४ हजार ७०५ इतक्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.२८) स्थायी समितीची मंजुरी दिली. प्रशासकीय राजवटीतील हे सर्वाधिक खर्चाचे काम आहे.

पिंपरी येथील महापालिका भवनाची चार मजली इमारत अपुरी पडत असल्याने नव्या जागेत नवीन प्रशस्त इमारत बांधण्याचा निर्णय झाला. यासाठी एचए कंपनी आणि पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून मिळालेल्या आयटूआरअंतर्गत मिळालेल्या जागेत इमारत बांधण्यात निर्णय झाला. मात्र, या जागा दर्शनी भागात नसल्याने अखेर चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील पालिकेची जागा निश्चित करण्यात आली.
तेथे १८ मजली पर्यावरणपूरक इमारती बांधण्याचा निर्णय झाला. त्या कामासाठी ३१२ कोटी २० लाख खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्या कामासाठी ५ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेडची ८.१९ टक्के कमी दराची आणि बी. जे. शिर्के कॅन्स्ट्रक्शनची ०.५० टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली. केएमव्हीचा २८६ कोटी ८३ लाख ७४ हजार ७०५ खर्चाच्या दरास आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे. तीन वर्षांत ही इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागांचा कारभार तेथून चालणार आहे.
























Join Our Whatsapp Group