पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज (मंगळवारी) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. जगताप यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयालगतच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गेली अनेक वर्ष आमदार जगताप यांनी चिंचवड मतदार संघातील लोकांसाठी काम केले. आजाराशी झुंज देत असताना व उपचार सुरू असताना ते विधान परिषद व राज्यसभा निवडणूक मतदान करण्यासाठी आले. कर्तव्य व जबाबदारीप्रती ते प्रामाणिक होते मतदारांसाठी व समाजासाठी त्यांनी वाहून घेतले होते त्यांच्या निधनाने समाजाचे व भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, सुनिल शेळके, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार विलास लांडे महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोंबे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आदींसह शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले.
आमदार जगताप यांना पंतप्रधानांची श्रद्धांजली..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अतिव दुःख झाले आहे. त्यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी आणि पुणे परिसराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना.