चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक काळेवाडी, विजयनगर, नढे नगर, ज्योतिबा नगर या भागात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. दिवसभर नाना काटे यांच्या प्रचारार्थ गाठी भेटी व भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला लोटलेली अभुतपुर्व गर्दी पाहता या प्रभागात नाना काटे यांनी जोरदार आघाडी घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

नाना काटे यांच्या प्रचारार्थ तापकीर चौक येथे सकाळी १० वाजल्यापासून गाठी भेटी घेण्यास सुरुवात करण्यात आली. तापकीर चौक, तापकीरनगर, तापकीर माळ चौक, विष्णुराज चौक बाजीप्रभू चौक या ठिकाणी गाठी भेटी घेण्यात आल्या. तत्पूर्वी या ठिकाणी गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले उपरणे, हातामध्ये घड्याळाचे चिन्ह असलेले फलक, उमेदवारांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करून वातावरण ढवळून काढत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. ताशाच्या तडतडाटाने या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे शिरलेले पाहायला मिळाले. संध्याकाळी ५ वाजता आदर्श मित्र मंडळ येथील गणपती मंदिर येथे श्रीफळ वाहून पद यात्रेला सुरुवात करण्यात आली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक संतोष कोकणे, माजी नगरसेविका उषा माई काळे, माजी नगरसेवक विजय सुतार, शिवसेनेचे उपशहर प्रमुख हरेश नखाते, विभाग प्रमुख सागर शिंदे, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष दस्तगिर मणियार, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सायली नढे, किरण नढे, राष्ट्रवादीचे नवनाथ नढे, सचिन काळे, कोमल काळे, बजरंग नढे, अश्विनी चंद्रकांत तापकीर, संगीता कोकणे, इरफान शेख, आदित्य काळे, दिलीप काळे, प्रभागाचे निरीक्षक शाम लांडे, निरीक्षक राहुल भोसले, निरीक्षक इखलास सय्यद, निरीक्षक प्रसाद कोलते, आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आदर्श नगर, नवरत्न चौक, कारवार चौक, ज्योतिबा मंगल कार्यालय, गणेश कॉलनी, ज्योतिबा मंदिर, जय मल्हार चौक, पवना चौक, पंचनाथ चौक, भारत माता चौक या परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करून पद यात्रा काढण्यात आली. या दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी या उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण अक्षरशः ढवळून निघाले होते. या दौऱ्यामुळे काळेवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. या दौऱ्यातून झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे तसेच नियोजनबद्ध प्रचारामुळे या प्रभागात नाना काटे यांची आघाडी निश्चित मानली जात आहे.
काळेवाडी भागात सुरुवातीपासूनच प्रचाराचे सर्व फंडे अंमलात आणले आहेत. विशेषतः सोशल मीडिया द्वारे जोरदार प्रचार सुरु आहे. शिवाय मतदारांच्या गाठीभेटी, कोपरा सभा, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून आपण केलेल्या विकासकामांची ध्वनिचित्र फीत दाखवून वातावरण ढवळून काढले जात आहे. या सर्व जोरदार प्रचारामुळे या प्रभागात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची हवा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा नियोजनबद्ध प्रचार आणि मतदाराचा वाढत पाठिंबा पाहता विरोधी पक्षाच्या गोटात अनिश्चिततेचे वातावरण पसरले असल्याची चर्चा आहे.
























Join Our Whatsapp Group