पिंपरी (Pclive7.com):- पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे उकाड्याने नागरीक हैराण झाले होते. अखेरीस बिघाड दुरुस्त झाल्यानंतर रात्री साडे बारानंतर एक एक भागाचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला.
पीजीसीआयएल शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरूवारी रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. रात्री साडे बारानंतरही अनेक भाग अंधारातच होते. सुमारे पाच ते सहा तासांनंतर टप्याटप्याने एक एक भागातील वीज पुरवठा सुरू करण्यात आले आला.