युवा नेते ॲड. मंगेश नढे यांचा महापालिकेला तीव्र जनआंदोलनाचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- मागील अनेक वर्षांपासून महापालिका हद्दीतील सर्वात दुर्लक्षित गाव असलेल्या काळेवाडीत पहिल्याच पावसात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच या कुंभकर्णी महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल मानद पशुकल्याण अधिकारी तथा युवा नेते ॲड. मंगेश नढे यांनी उपस्थित केला आहे.

जवळपास पाऊण लाख लोकसंख्या असलेल्या काळेवाडी प्रभागातील विविध भागांतील रस्त्याची चाळण झाली असून, आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला दिसत आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रभागात विकासकामांच्या नावाखाली खोदण्यात आलेले रस्ते व्यवस्थित न बुजविल्याने तसेच त्या खोदलेल्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात न आल्याने साई इन्कलू, पवार हाईट्स येथील रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले आहेत. तर अनेक भागात विशेषतः नढेनगर येथील राजवाडे लॉन्स, राधाकृष्ण मंदिर, ओंकार कॉलनी या परिसरात वर्षानुवर्षे रस्तेच करण्यात न आल्याने त्याठिकाणी पाणी साचून त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकानाहून ये-जा करायची कशी? असा प्रश्न पादचारी, वाहनचालक, विद्यार्थी आणि लहान मुलांना पडलेला आहे.

रात्रीच्या वेळी बहुतांश परिसरातील रस्त्यांवरील पथदिवे बंद असतात. अशावेळी या खड्ड्यांमध्ये एखादा वाहनचालक किंवा पादचारी, लहान मुले पडून एखादा जीवघेणा अपघात झाला तट त्याला जबाबदार कोण? त्यामुळे लवकरात लवकर काळेवाडीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नाही तर जनआंदोलन उभारण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल असा इशारा ॲड. मंगेश नढे यांनी दिला आहे.