पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यामागे उभारण्यात आलेले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गुंडाळण्याचे षडयंत्र केले जात आहे. या स्मारकात महापालिकेच्या वतीने विविध कार्यालय थाटण्याचा घाट घालण्यात येत आहे. येत्या ८ दिवसांत या स्मारकाचे उद्घाटन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्यावतीने देण्यात आला.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेला नगरसेवक संतोष लोंढे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, देवेंद्र तायडे, प्रा. दि.बा. बागुल, ॲड. चंद्रशेखर भुजबळ, ईश्वर कुदळे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील, विलास गव्हाणे, अनिल साळूंखे, पी. के. महाजन, एस. एन. महाजन, अजय जाधव आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यामागे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्याचे नियोजन होते. मात्र हे स्मारक रद्द करून महापालिकेतील शिक्षण मंडळ, जीएसटी, आकाश चिन्ह परवाना अशी कार्यालये नेण्याचा कट रचला जात आहे. याबाबत अनेक वेळा मनपा अधिकारी व पदाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले आहे. मात्र त्यांतर देखील आयुक्तांच्या आदेशाने येथे या कार्यालयांचे फर्निचर व इतर कामे सुरु असल्याचे प्रत्यक्ष दिसत आहे. याबाबत महापालिका आयुक्त, महापौर, पक्षनेते यांना भेटून निषेध नोंदविला असून पत्र देखील दिले आहे. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येईल. येथे स्मारकाला डावलून मनपाची कार्यालये थाटल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा समितीच्या वतीने आनंदा कुदळे यांनी दिला.