पिंपरी (Pclive7.com):- अल्पसंख्यांक अकादमीच्या धर्तीवर मराठवाडा विद्यापीठात ‘पाली अकादमी’ची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी त्याबाबतची घोषणा केली.
पाली अकादमी स्थापन करण्याबाबत राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आमदार व पाली भाषेचे प्राध्यापक ॲड. गौतम चाबुकस्वार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव एस. एस. तागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पाली आणि बुद्धिझम विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पगारे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली विभागाचे डॉ. महेश देवकर, के. जी. सोमय्या फॉर बुद्धिष्ट स्टडीजच्या प्रभारी संचालक डॉ. सुप्रिया राय आदी यावेळी उपस्थित होते.
बडोले यावेळी म्हणाले की, पाली भाषेत विपुल प्रमाणात साहित्य आहे. पाली साहित्याची लोकांना माहिती व्हावी, लोकांना पाली भाषा शिकता यावी, पाली मधील ग्रंथांचे भाषांतर होण्याच्या दृष्टीने आणि पाली भाषेच्या विकासासाठी विविध कार्यक्रम अंतर्भूत होईल, अशा प्रमाणे प्रगल्भ अशा पाली अकादमी बाबतचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी समिती गठित करावी, अशा सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
पाली भाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. ज्या शाळा पाली भाषा सुरू करतील अशा शाळांना पाली अकादमीच्या माध्यमातुन अनुदान देण्याबाबतही विचार व्हावा. पाली भाषेच्या प्रसारामुळे जुन्या संस्कृतीची ओळख होईल. यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल असे मत आमदार चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.