३६ जिल्ह्यांचा प्रवास करत देणार “सायकल चालवा, पर्यावरण वाचविण्याचा संदेश”; भोसरी येथून उद्या सकाळी मोहिमेला होणार सुरुवात
पिंपरी (Pclive7.com):- “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा” असा संदेश देत महाराष्ट्र दर्शन मोहिमेवर भोसरीतील मोशी, स्पाईन रोड येथील ६६ वर्षीय तरुण निघाला आहे. सायकल मित्र प्रकाश का. पाटील (पाटील काका) असं त्यांचं नाव आहे. या महाराष्ट्र दर्शन सायकल अभियान मोहिमेत ते राज्यातील ३६ जिल्ह्यांचा प्रवास करणार आहेत. उद्या रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७ वाजता भोसरीतील पीएमटी चौक येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

या मोहिमेकरिता त्यांना कामगार नेते, सायकल मित्र सचिनभैया लांडगे, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी विशेष सहकार्य केले आहे. या ३६ जिल्ह्यांच्या मोहिमेचा प्रवास उद्या दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. ही मोहीम सुमारे ६ हजार किलो मीटरची असणार आहे. साधारणता तीन महिन्यांचा कालावधी या प्रवासाला लागणार आहे. दररोज १२५ किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील मुठभर माती ते गोळा करणार आहेत. हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर दिघी येथील डोंगरावर ३६ जिल्ह्यातून आणलेल्या मुठभर मातीसह ३६ झाडे ते लावणार आहेत. झाडे लावा पर्यावरण वाचवा असा संदेश ते या मोहिमेच्या माध्यमातून देणार आहेत.

सायकल मित्र प्रकाश का. पाटील हे गेले अनेक वर्षे सायकलिंग करत आहेत. आज पर्यंत पुणे ते नेपाळ, पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते रामेश्वर, पुणे ते गोवा, पुणे ते खान्देश, पुणे ते तिरूपती बालाजी, पुणे ते हम्पी, तीन वर्ष प्रत्येक महिन्याला पंढरपूर वारी, अष्टविनायक दर्शन, पुणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात तसेच भारतातील सोळा राज्यांचा सायकल प्रवास त्यांनी आजपर्यंत पूर्ण केला आहे.






















Join Our Whatsapp Group