पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या वतीने रक्षाबंधन निमित्त अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत.
रक्षाबंधन या सणाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी भाऊ-बहीण एकमेकांच्या घरी जातात. या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. नागरिकांची गरज लक्षात घेत पीएमपीएमएलच्या वतीने ९६ जादा बस सोडण्यात येणार आहेत. दैनंदिन संचलनात असलेल्या १८३७ आणि अतिरिक्त ९६ अशा एकूण १९३३ बस या दिवशी रस्त्यावर धावणार आहेत.
जादा बस गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरुन कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगाव, राजगुरुनगर, व देहूगाव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधन ३० ऑगस्ट रोजी असून ३० आणि ३१ ऑगस्ट या दोन दिवशी पीएमपीच्या वतीने अतिरिक्त बससेवा पुरविण्यात येणार आहे.
महामंडळातील अधिकारी, लिपिक व इतर कर्मचारी यांची महत्त्वाच्या स्थानकांवर व थांब्यावर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक करण्यात आली आहे.