पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात नवीन अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी बर्न हॉस्पिटल उभारण्यात यावे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात त्वरित बर्न वॉर्ड निर्माण कण्यात यावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना नाना काटे यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. यांत म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात तळवडे औद्योगिक परिसरातील फायर केन्डल बनवणार्या कारखान्यामध्ये स्फोट होऊन कंपनीतील ७ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत काही कामगार हे गंभीररित्या जखमी होऊन वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अधिक २ कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ९ वर गेली आहे. शहरात असे दुर्दैवी अपघात होत असतात, किंवा असे अपघात झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेचे एकही BURN हॉस्पिटल किंवा महापालिकेच्या रुग्णालयात BURN वॉर्ड ही सुविधा उपलब्ध नाही.
ही अत्यंत खेदाची आणि गंभीर बाब असून, शहरात अश्या घटना घडल्यास जखमी रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालय किंवा अन्यत्र खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे अशा जळीत दुर्घटनेतील रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांचे बळी देखील जात आहेत. तरी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी या मुद्याकडे अतिशय गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावर निर्णय घ्यावा. तसेच पिंपरी चिंचवड शहरात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी बर्न हॉस्पिटल व महापालिकेच्या रुग्णालयात त्वरित बर्न वॉर्ड तयार करण्यात यावेत अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.