पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिराजवळ तीन दिवसांपूर्वी (दि.२७) रोजी ८ वर्षीय मुलगा पवना नदीत बुडाला होता. या मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर आज मंगळवारी (दि.३०) रोजी पिंपळे सौदागर येथील नदी पात्रात सापडला आहे.
विशाल भीम थापा (वय ८, रा. इंद्रायणीनगर, डिलक्स चौक, पिंपरी, मूळ रा. नेपाळ) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा त्याच्या काही मित्रांसोबत (दि.२७) रोजी पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिर येथे पवना नदीत पोहायला गेला होता. त्यावेळी अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तीन दिवस थेरगाव आणि पिंपरी अग्निशमन विभागाचे जवान सातत्याने पवना नदी पात्रात विशाल याचा मृतदेह शोधण्याचे काम करीत होते. दरम्यान आज (दि.३०) मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ विशाल याचा मृतदेह सापडला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
विशाल याचे वडील भीम काशीराम थापा हे एका हॉटेलमध्ये काम करतात. तर त्याची आई मीना थापा मजुरीचे काम करतात. तसेच विशाल याला एक चार वर्षीय भाऊ आहे. मूळचे नेपाळ येथील असलेल्या भीम थापा यांनी त्यांच्या दोन मुलांना आणि पत्नीला दोन महिन्यांपूर्वी नेपाळ येथून पिंपरीत आणले होते.