पिंपरी (Pclive7.com):- भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी समोर आली आहे. दुचाकी चोरणाऱ्या सराईताला सापळा रचून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीच्या १६ दुचाकी जप्त केल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (२४, रा. वळसाने, धुळे.) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरात दुचाकी चोरीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये सराईत निष्पन्न झाला. त्यानुसार, पोलिसांनी तपास पथके तयार करून आरोपीला भोसरी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार मॉन्टी वाघ (२२, वर्षे रा. दहिवद, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परिसरातून १६ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या आहेत.
आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटारसायकल चोरटा असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण येथे दुचाकी चोरीचे एकूण १७ गुन्हे केले आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या एकूण ३ लाख ८४ हजार रुपयांच्या १६ मोटारसायकल हस्तगत करणेत भोसरी तपास पथकाला यश आलेले आहे.
ही कामगिरी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, निरीक्षक रूपाली बोबडे, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोरे, कर्मचारी हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, नाइक मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांच्या पथकाने केली आहे.