पिंपरी (Pclive7.com):- स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे भक्ती-शक्ती चौक ते तुळापूर अशी ६० किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली. त्यामध्ये, ५०० सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.
इंडो ॲथलेटिक्स सोसायटी (आयएएस) मार्फत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष होते. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पहाटे पाच वाजता राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी प्रकाश शेडबाळे, आयएएसचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीला सुरुवात झाली. तत्पूर्वी, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सदस्या प्रज्ञा अजगर यांनी शंभू महाराजांवर एकपात्री प्रयोग सादर केला.
सर्व सायकल स्वारांनी भक्ती शक्ती निगडी – नाशिक फाटा – चऱ्होली फाटा – आळंदी – तुळापूर – वढू असा प्रवास केला. या फेरीत पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर आणि इतर विविध भागांतून सायकल प्रेमींनी सहभाग घेतला. तुळापूर येथे सायकलस्वारांनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना दिली. इंडो ॲथलेटिक सोसायटीचे गिरीराज उमरीकर, अजित गोरे, अविनाश चौगुले, प्रशांत तायडे, मारुती विधाते यांनी सूत्रसंचालन केले.