पिंपरी (Pclive7.com):- मराठीतील कला, साहित्य आणि संस्कृती समृद्ध असून ते प्रसिद्ध देखील आहे. मराठी चित्रपट अमराठी रसिकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. अमराठी रसिक सब टायटल दिलेले मराठी सिनेमा आवडीने बघतात. मात्र मराठी रसिकांचे मराठी चित्रपटावर कुठेतरी प्रेम कमी पडत आहे. अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने सौ.कुलकर्णी यांना कलाविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, हभप शेखर महाराज जांभुळकर, माजी नगरसेवक नाना काटे, शत्रूघ्न काटे, पंढरपूरचे नगरसेवक विक्रम शिरसाठ, पं.रवींद्र गांगुर्डे, प्रयोजक संतोष काटे, धनंजय भिसे, गणेश भिसे, अरुण चाबूकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
दाक्षिणात्य चित्रपट भरभरून गल्ला करतो तसे मराठी चित्रपटाबाबतीत दिसून येत नाही. असा प्रश्न फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी मुलाखती घेताना सौ. कुलकर्णी यांना विचारला असता त्या म्हणाल्या कि, पैसे खर्च करून थिएटरमध्ये सिनेमा बघायला जाण्याची रसिकांची तयारी नाही हे दुर्दैवी आहे. मल्टीप्लेक्स मध्ये तीन प्रकारचे सिनेमे लागलेले असतात. त्यावेळी मराठी रसिक सर्वप्रथम हिंदी सिनेमा बघण्याला प्राधान्य देतो. नंतर एखादा पुरस्कार विजेता मग शेवटी मराठी बघू असे तो ठरवतो.मात्र शनिवार – रविवारला थिएटरमध्ये गर्दी नसेल तर तो सिनेमा चित्रपट गृहातुन दुसऱ्या हप्त्यात काढला जातो. आपण आपल्या मराठी सिनेमावर प्रेम करायला कुठेतरी कमी पडत आहोत. मात्र दाक्षिणात्य रसिक सर्वप्रथम मातृभाषेतल्या सिनेमाला प्राधान्य देत त्यांच्या भाषेतील सिनेमा सर्वप्रथम सिनेमा बघतात. त्यामुळे ते सिनेमे प्रचंड चालतात.