चिंचवड (Pclive7.com):- अतिवृष्टीमुळे किवळे येथील मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंप विकासनगरला जाणाऱ्या रस्त्यावरती मोठ-मोठे खड्डे पडले होते. हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस यांनी तत्काळ पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून घेण्याचे काम सुरू केले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केवळ येथील मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंप विकास नगरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते. विकासनगर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात मुकाई चौक बस स्टॉप येथे ये-जा करत असतात. रात्रीच्या वेळेस खड्डे दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ही बाब शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला. तसेच स्वतः जातीने लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करून घेतले. निलेश तरस यांनी दाखवलेली तत्परता आणि पुढाकार यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मुकाई चौक ते विकास नगर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे लक्षात आल्यावर मी तातडीने महापालिका प्रशासनाला कळवून हे खड्डे बुजवून घेतले आहेत. किवळे परिसरातील नागरिकांना कोणतीही मूलभूत समस्या असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. नक्कीच त्यांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू.– निलेश तरस, शिवसेना शहरप्रमुख.