पिंपरी (Pclive7.com):- गेल्या २४ तासात पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. धरण सध्या ९३ टक्के भरले असून आज आणखी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आज (दि.०४) सकाळी दहा वाजल्यापासून धरणातून ७०७० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण सद्यस्थितीत ९३ टक्के भरलेले असून धरणाच्या सांडव्यावरून ३६०० क्युसेक्स तर जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स असा एकुण ५००० क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शपावसाचा जोर वाढलेला असल्याने पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज (दि.०४) सकाळी १० वाजता सांडव्यावरून विसर्ग वाढवून ५६७० क्युसेक्स करण्यात येणार आहे. तरी नदी पात्रामध्ये एकुण ७०७० क्युसेक्स (५६७०+१४००= ७०७० क्युसेक्स) इतक्या क्षमतेने विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.