पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षक उमेश लोंढे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारदाराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी उमेश लोंढे याने ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने पिंपळे गुरव परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना उमेश लोंढे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धडक कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सार्वजनिक कामांसाठी अथवा प्रशासकीय प्रक्रियेसाठी कोणताही शासकीय कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group