
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारवाई; कोट्यवधींच्या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधाराला भारतात आणले
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई करत दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक केली आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्कुलरच्या मदतीने थायलंडमधील बँकॉक विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भारतात आणून त्याच्यावर अधिकृत अटकेची कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे असून, त्याच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक मोठ्या सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणाच्या तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. जून २०२४ मध्ये या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशीत गणेश काळे हा दुबईतून संपूर्ण रॅकेटचे संचालन करत असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काळे भारतातील विविध व्यक्तींकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड मिळवत होता. त्याबदल्यात संबंधितांना पैसे दिले जात होते. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध ठिकाणी वळवण्यासाठी केला जात होता. यासाठी त्याने दुबईमध्ये स्वतंत्र कार्यालयदेखील उभारले होते.

सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासातून आरोपीचे चीनसह इतर विदेशी नागरिकांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. टास्क फ्रॉड, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक तसेच डिजिटल अरेस्टसारख्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमधून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. हिंजवडीतील १८ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तसेच पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २ कोटी ६६ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही त्याचा सहभाग आढळून आला आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये तो दुबईहून बँकॉकला पळून गेला होता. मात्र, इंटरपोलच्या मदतीने त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
११ जून रोजी मुंबई विमानतळावर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा ताबा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर गुन्हेगारांविरोधातील ही कारवाई पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या इतिहासातील महत्त्वाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारी मोहीम मानली जात आहे.




















Join Our Whatsapp Group