आळंदी (Pclive7.com):- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथासाठी निवडल्या जाणाऱ्या सारथी बैलजोडीच्या मानावरून वाद निर्माण झाला आहे. बैलजोड समितीने तुळशीराम रानवडे आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर उमेश रानवडे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत बैलजोडीसह सहकुटुंब बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

उमेश रानवडे यांचा दावा आहे की, यंदा माऊलींच्या रथासाठी सारथी बैलजोडीचा मान त्यांच्या वाट्याला येणे अपेक्षित होते. मात्र, समितीने दुसऱ्यांची शिफारस करून त्यांना डावलल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आंदोलनासाठी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरासमोर ठिय्या मांडला असून, त्यांच्या कुटुंबीयांसह बैलजोडी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहे.

या प्रकरणामुळे वारकरी संप्रदायात आणि आळंदी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आषाढी वारीसारख्या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या तोंडावर निर्माण झालेला हा वाद सोडवण्यासाठी संबंधित समिती आणि प्रशासनाने मध्यस्थी करावी, अशी मागणी काही वारकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, उमेश रानवडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, “मला मान किंवा प्रतिष्ठा नको आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे,” असे सांगितले. या आंदोलनामुळे सारथी बैलजोडी निवडीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यावर समितीची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group