
पिंपरी (Pclive7.com):- अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहरात १८ ऑगस्ट २०२६ रोजी मातंग समाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या महामोर्चाची सुरुवात गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन येथून सकाळी १० वाजता होणार असून, मोर्चा चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालय असा मार्गक्रमण करणार आहे. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप होणार आहे. आयोजकांच्या मते, अनुसूचित जातींमधील विविध घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय मिळावा, यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. या मागणीसाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने शासन व प्रशासनापर्यंत समाजाचा आवाज पोहोचविण्याचा उद्देश या जनआक्रोश मोर्चामागे असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये विभागनिहाय बैठका, जनजागृती मोहीम तसेच समाजबांधवांशी प्रत्यक्ष संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विभागातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत यासाठी व्यापक नियोजन सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी वाल्मिकी, मादीगा आणि खाटीक समाजानेही मोर्चाला समर्थन दर्शविले असून त्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे.

महामोर्चाची माहिती..
📅 दिनांक: १८ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० वाजता
📍 प्रारंभ: गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन
➡️ मार्ग: चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालय
🏁 समारोप: निगडी तहसील कार्यालय

सकल मातंग समाज तसेच सर्व समाजबांधवांनी शांततामय, शिस्तबद्ध आणि एकजुटीने या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group