पिंपरी (Pclive7.com):- चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने मोक्का कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलिसांना सातत्याने गुंगारा देत ठिकाणे बदलणारा आरोपी अंबादास राजू राठोड याला शिताफीने जेरबंद करण्यात आले.

चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांकातील बीएनएस व मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यात आरोपी अंबादास राठोड हा मागील सहा महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. मात्र आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

दरम्यान, गुन्हे तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात असल्याचे समोर आले. विशेष बाब म्हणजे, या संपूर्ण कारवाईत कोणत्याही तांत्रिक साधनांचा वापर न करता केवळ पारंपरिक गुप्त बातमीदारांच्या अचूक नेटवर्कच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यानंतर कर्नाटक राज्यातील कलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून अंबादास राठोड याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण तसेच पोलीस हवालदार विनोद होनमाने, प्रवीण भोमाळे, अरुण साबळे आणि कंठया स्वामी यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

या कारवाईमुळे चिखली पोलिसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, फरार आरोपींविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.






















Join Our Whatsapp Group