पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण तुटपुंज्या रकमेवर खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. त्या आरक्षित जागेवर मनपाने गोर गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी. या शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देणे म्हणजे मनपाचे खासगीकरण करण्याचा प्रकार आहे. हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये आणि मनपाचे खासगीकरण थांबवावे नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटिका वैशाली काटकर, वैशाली कुलथे, पिंपरी उपशहर प्रमुख अमोल निकम, समन्वयक पार्थ गुरव, उपशहर प्रमुख दिलीप सावंत, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, योगेश राऊत, उज्वला सावंत, तस्लीम शेख, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, पूनम रिठे, वंदना खंडागळे आदी उपस्थित होते.
यावेळी चेतन पवार यांनी सांगितले की, पुनावळे येथील शाळेचे आरक्षण ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन यांना भाडे कराराने देऊ नये. भूमी जिंदगी कार्यालय कडून भाडे प्रती चौरस फुट ३ रु ६० पैसे असा ठरविण्यात आले आहे. हे सर्व संशयास्पद असून नक्की कोणत्या आधारे हा दर ठरविण्यात आला आहे हे स्पष्ट करावे. तेथे पिंपरी चिंचवड मनपा कडून गोर गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या दर्जेदार स्वरूपाची शाळा उभारावी. तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यासाठी जगदंब महिला रेडीमेड ड्रेसेस यांना कोणतीही निविदा प्रक्रिया न करता हा ठराव पास करण्यात आला हे कोणाच्या दबावात झाले. याचे स्पष्टीकरण द्यावे तसेच यामध्ये गणवेशाची रक्कम वाढवून दाखवण्यात आली आहे, हा ठराव रद्द करून याची कायदेशीर निविदा प्रक्रिया करावी.

तसेच पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीची दुरवस्था झाली आहे. पवना नदीत राडारोडा टाकून नदीपात्र छोटे करण्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी डायरेक्ट पाईप लाईन द्वारे अस्वच्छ पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तर रावेत हायवे वरील ब्रीज खाली अनेक लोक जुगार खेळत असून नदीत कचरा टाकतात.
ताथवडे येथील सर्वे नं ६४/२/१ मधील जागा बिल्डरकडून विकसित होत असताना नगररचना विभागाकडून अभिप्राय घेतला असता सदरील जागेत नाला असे दाखविले आहे. परंतु प्लॅन पास करताना नाला सी आकारात शिफ्ट करण्यात आला असून त्यामुळे अनेक लोकांचे नुकसान होणार आहे. या ठिकाणाचा बांधकाम परवाना रद्द करावा.
तसेच ताथवडे गाव येथील जिल्हा परिषदेची शाळा महानगर पालिकेकडे वर्ग करण्याबाबत २०१३ साली शासन आदेश होवून सुद्धा आज पर्यंत ती वर्ग करून घेत नाही असा मनमानी कारभार महानगरपालिकेत सुरू आहे. याला पायबंद घालावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनचा इशारा यावेळी शहराध्यक्ष चेतन पवार यांनी दिला.




















Join Our Whatsapp Group