पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र, खेळादरम्यान अनेकदा खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत खेळाडूंना आर्थिक मदत व वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्व सहभागी खेळाडूंचा दुखापत विमा (Accident Insurance) काढून द्यावा, अशी मागणी अरुण पाडुळे, क्रीडा शहराध्यक्ष, भाजपा यांनी केली आहे.

अरुण पाडुळे यांनी सांगितले की, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होताना खेळाडू जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दुखापत झाल्यास उपचारांचा खर्च खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांवर पडतो. त्यामुळे महानगरपालिकेने स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेसोबतच सर्व खेळाडूंना विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे.

तसेच, गंभीर दुखापतीच्या प्रसंगी खेळाडूंना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी स्पर्धा स्थळी वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचीही मागणी त्यांनी केली. यामुळे खेळाडूंमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि अधिकाधिक युवक क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आगामी सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंसाठी दुखापत विमा योजना लागू करावी, अशी अपेक्षा अरुण पाडुळे यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group