पिंपरी (Pclive7.com):- भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यांला आज अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणूनच एनडीआरएफचे पथक शहरात दाखल करण्यात आले आहे.
पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान रात्रीपासूनच बोपखेल, सांगवी, पिंपरी, चिंचवड येथील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्याचे काम सुरू आहे. आज पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू असून नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथक शहरात दाखल करण्यात आले. हे पथक शहरातील ज्या भागात लोकवस्तीत पाणी शिरते त्या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे.