चिंचवड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांचे ग्रामदैवत असलेले मोरया गोसावी गणपती मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली जात आहे. पवना धरणातून पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पवना नदीचे पाणी आज मोरया गोसावी गणपती मंदिरात शिरले आहे. पवना धरण सध्या ९४ टक्के भरले असून दुपारी साडेबारा वाजता ८९६० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे पवना धरण पात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पवना धरण पूर्णपणे भरले असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास मोरया गोसावी मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.