पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढावे यासाठी खासदार श्रीरंग बारणे गेली तीन वर्ष प्रयत्न करीत होते. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना भेटून त्यांनी १८ एप्रिलला चापेकरांचा स्मृतिदिन असल्याने त्या दिवशी तिकीट प्रसिध्द करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांची भेट घेऊन त्या मागणीचा पुनरुच्चार केला. १८ एप्रिल २०१८ रोजी क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट केंद्रीय संचार मंत्रालय विभागाकडुन प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या बरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते.
क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी १८९७ मध्ये वाल्टर चार्ल्स रॅण्डचा वध केला होता. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी गेली तीन वर्ष पाठपुरावा केला. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी याबाबत सर्व मदत बारणे यांना केली.
१८ एप्रिल २०१८ रोजी चापेकरांच्या जन्मगावी चिंचवड येथे अथवा दिल्ली येथे क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले जाणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. क्रांतिवीर चापेकरांचे पोस्टाचे तिकीट म्हणजे क्रांतिवीर चापेकरांच्या स्मृतीस अभिवादन ठरेल असे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group