पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले. या उपक्रमामुळे निगडी पोलीस ठाण्यात काम करणा-या महिला पोलीस कर्मचारी, बंदोबस्तासाठी येणा-या महिला कर्मचारी तसेच तक्रारी व अन्य कामानिमित्त येणा-या सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे.
महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्ष साधना काळभोर, प्रणिता अलुरकर, शकुंतला बन्सल, सभासद सुजाता ढमाले, डॉ. रंजना कदम, माधुरी भुरकुले, नियोजित अध्यक्ष प्रतिभा दलाल, राजश्री , रो. विजय काळभोर, रो. रवी राजापूरकर, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन मधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. यामुळे सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर, कचराकुंड्यांमध्ये उघड्यावर टाकल्याने उद्भवणा-या विविध त्रासांपासून सुटका मिळणार आहे. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते. या उपक्रमामुळे महिला पोलीस कर्मचारी व उपस्थित महिलांच्या चेह-यावर भावनिक आनंद ओसंडून वाहत होता.
याबाबत बोलताना इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड च्या अध्यक्षा सविता राजापूरकर म्हणाल्या की, “महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणे ही काळाची गरज आहे. शहर शांत राहण्यासाठी पोलीस कर्मचा-यांना सतत कर्तव्यावर रहावे लागते. महिला पोलीस कर्मचारी देखील यामध्ये मागे नाहीत. मात्र सॅनिटरी नॅपकिन सारख्या काही गोष्टींमुळे त्यांची वाताहत होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा महिला पोलीस कर्मचारी व अन्य महिला लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले म्हणाले की, “अशा प्रकारचा उपक्रम परिसरात प्रथमच सुरु करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनची सर्वत्र उपलब्धता ही काळाची गरज आहे. ही गरज सर्वांनी ओळखून अशा स्तुत्य उपक्रमांना चालना द्यायला हवी. पोलीस ठाण्यात सतत महिलांचा वावर असतो. हा उपक्रम पोलीस ठाण्यात सुरु केल्याने गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.”
























Join Our Whatsapp Group