‘हिंजवडी आयटी पार्क’ समस्यामुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणीचा सिलसिला
पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची देश-विदेशात ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण करणारा हिंजवडी आयटी पार्कला समस्यामुक्त करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. आयटीयन्स आणि सोसयटी फेडरेशनच्या प्रतिनिधींची बैठक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लावली. या प्रश्नाला फडणवीस- लांडगे यांनी ‘तडका’ काय दिला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट हिंजवडी दौरा आणि प्रत्यक्ष पाहणीचा ‘‘धडाका’’च लावला आहे.

वास्तविक, हिंजवडी आयटी पार्क हा भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात येतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर प्रतिनिधीत्व करतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हिंजवडी समस्यामुक्त करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर येते. पण, स्वत:च्या मतदारसंघ क्षेत्रात नसलेल्या या आयटी पार्कचा विषय भाजपाचे आमदार महेश लांडगे यांची उचलून धरला.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. १५ वर्षांहून अधिककाळ ‘‘पुणे जिल्ह्याचे कारभारी’’ असलेल्या अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांबाबत आता प्रत्यक्ष पाहणी आणि बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. अतिक्रमण आणि रस्त्यांच्या कामात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी रोखठोक भूमिका घेत हिंजवडीचे ग्रामस्थ आणि स्थानिक आमदारांनाही वेळोवेळी सुनावले आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खळबळ…
हिंजवडी आयटी पार्क आणि मुळशीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकर मांडेकर आहेत. या मतदार संघातील आयटी पार्कचा विषय आमदार महेश लांडगे यांनी उचलून धरला. त्यामुळे आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनीही समाधान व्यक्त केले. 15 वर्षापेक्षा अधिककाळ पालकमंत्री म्हणून सत्तेमध्ये राहणाऱ्या अजित पवारांना हिंजवडीतील प्रश्नांबाबत एवढी कसरत करावी लागते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्वत: अजित पवार यांना आत्मचिंतन करावे लागेल. एका बाजुला अजित पवार कामाला लागल्यामुळे महायुती सरकारची व थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इमेज’ भाजपाचा ‘कोअर व्होटर’ असलेल्या आयटी परिसरात उंचावत आहे.

























Join Our Whatsapp Group